लातूर : प्रतिनिधी
यदांच्या पावसाळ्याचे महत्वाचे २ महिने संपले आहेत. हमखास पाऊस पडणारा जुन महिना कोरडा गेला. त्यामुळे जुलै महिन्यात तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. पण, शेवटच्या दोन दिवसांत पाऊस झाला. पण अपेक्षीत पाऊस पडला नाही. हे दोनही महिने पावसाच्याबाबतीत अगदीच सर्वसाधारण गेले. आता ऑगस्ट महिन्याची १० तारीख होऊन गेली तरी पाऊस नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प भर पावसात तहानलेलेच आहेत. लातूर, धाराशिव व बीड या तीन जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या मांजरा धरणात आजघडीला केवळ १६.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा व धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प, लातूर तालुक्यातील तावरजा, रेणापूर तालुक्यातील व्हटी, रेणापूर, उदगीर तालुक्यातील तीरु, देवर्जन, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, घरणी आणि निलंगा तालुक्यातील मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प व १३५ लघू प्रकल्प अशा एकुण १४५ प्रकल्पांत सध्या १४.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ही टंचाई लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी टंचाईच्या उपाययोजनांसाठी महिनाभराची मुदतवाढ दिली आहे.
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रकल्पांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. मांजरा व निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांत सध्या ५३.१८२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी १९.८३ एवढी आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांत ११.८३ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ९.६८ एवस्ी आहे. तर जिल्ह्यात १३५ लघू प्रकल्पांत ३१.६७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १०.०३ एवढी आहे. असा एकुण १४५ प्रकल्पांत ९६.९६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी १३.६९ इतकी आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दिलेल्या मुदतवाढीच्या आदेशानूसार मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिका-यांनी प्रत्यक्ष पाणीटंचाई निर्माण झालेली गावे, वाड्यांमध्ये स्थानिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन तातडीने उपायोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शासनान्या नियमानूसार नागरी व ग्रामीण भागाकरीता खासगी विहीर किंवा विंधन विहीर अधिग्रहणास मान्यता देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते प्रदान करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन आवश्यकतेनूसार उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत.
















