धाराशिव : प्रतिनिधी
जिल्ह्यात यावर्षी आत्तापर्यंत चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पिके चांगल्या प्रकारे डोलू लागली आहेत. त्यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे. गत कांही वर्षांपासून जिल्ह्यात पर्जन्यमान कमी-अधिक प्रमाणात होत होते. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या करताना शेतक-यांना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सुरूवातीला झालेल्या पावसावरच जिल्ह्यातील शेतक-यांनी पेरण्या उरकून घेतल्या होत्या. त्यामुळे पिकांची चांगली वाढ झाली आहे. वेळेवर पाऊस पडल्याने शेतीकामेही वेळेत पूर्ण झाली आहेत. असे असतानाच कांही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे.
कारण पावसामुळे अनेक भागातील सोयाबीन पिके पिवळी पडू लागली असून, आळ्यांचा प्रादुर्भावर होण्यास सुरूवात झाली आहे. सतत पाऊस सुरू असल्याने शेतक-यांना फवारणी करण्यास अडचणी येत आहेत. जिल्ह्याच्या कांही भागात पावसाने उघडिप दिल्यानंतर शेतक-यांनी फवारण्या उरकून घेतल्या आहेत. त्यामुळे या भागातील पिके चांगल्या प्रकारे डोलू लागली आहेत.
गत कांही वर्षांपासून पिकांच्या वाढीवेळी पावसाची आवश्यकता असतानाही पाऊस पडत नव्हता. आणि पडलाच तर पिके काढण्याच्यावेळी पडत असल्याने शेतक-यांचे आतोनात नुकसान होत होते. त्यामुळे शेतक-यांना म्हणावे तसे उत्पन्न पदरी पडले नाही. मात्र, यावर्षी सुरूवातीपासूनच पाऊस चांगल्याप्रकारे पडल्याने पिकांची योग्य वाढ झाली आहे.