३ कोटी ६५ लाख रुपयांचे अपहार प्रकरण
लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील खंडापूर अखंड हरिनाम सप्ताहातून ३ कोटी ६५ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. महिनाभरापासून किशोर धोंडिबा जाधव उर्फ किशोर महाराज शिवणीकर (पिस्तुल्या) फरार होते. त्याला मोतीनगर येथील नव्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे अधिक तपासासाठी वर्ग केले होते. एमआयडीसी पोलिसांनी किशोर महाराज शिवणीकरला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची म्हणजेच दि. १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
लातूर तालुक्यातील खंडापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व पादुका दर्शन सोहळा पार पडला होता. या सोहळयात किशोर धोंडिबा जाधव उर्फ किशोर महाराज शिवणीकरने ३ कोटी ६५ लाखांचा अपहार केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गेल्या महिनाभरापासून फरार किशोर महाराज शिवणीकर मोतीनगर लातूर येथील घरात लपून बसला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घर भाड्याने राहण्याच्या बहान्याने घरात दाखल झाले. त्यावेळी त्याचा शोध लागला. त्यावरून घराच्या वरच्या घराचे कुलूप उघडून किशोर महाराज शिवणीकरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिसांकडे सुपूर्द केले होते. दरम्यान, एमआयडीसीच्या पोलिसांनी काल किशोर महाराज शिवणीकरला न्यायालयापुढे हजर केले असता ४ दिवसांची म्हणजेच दि. १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
















