मुंबई : प्रतिनिधी
आखातात सुरू झालेल्या युद्धामुळे भारत देश चांगलाच होरपळत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उर्जासंकट निर्माण झाले आहे. नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाची भारतात मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळेच गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. गॅस बुक करूनही लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाही. त्यामुळेच आता महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पीएनजी कनेक्शन घेणे शक्य आहे, तिथे लवकरात लवकर अर्ज करा. घरात पीएनजी कनेक्शन लावून घ्या, असे आवाहन केंद्र तसेच राज्यातील सरकारकडून केले जात आहे.
पीएनजी कनेक्शन लवकरात लवकर दिले जावे यासाठी नियम आणि अटी शिथील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याच पीएनजी कनेक्शनबाबत बोलताना अण्ण व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी तुमचे गॅस सिलिंडर मिळण्याचे कनेक्शन बंद होऊ शकते, असे सांगितले आहे.
ज्या ज्या ठिकाणी पीएनजी कनेक्शन घेणे शक्य आहे, त्या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज करा, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे. तसेच ज्या भागात पीएनजीची व्यवस्था आहे, तिथे पीएनजी कनेक्सनसाठी तीन महिन्यांच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे.
घरगुती असो किंवा व्यावसायिक उद्देशासाठी असो तुमच्या भागात पीएनजीची सुविधा असेल तर त्यांनी तसे कनेक्शन मिळावे यासाठी अर्ज करावा. पीएनजीच्या कनेक्शनसाठी अनेक कंपन्या कार्यरत आहेत. त्यांना राज्यातील वेगवेगळे भाग वाटून दिलेले आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले.
तसेच, पीएनजीसाठी अर्ज कुठे करावा हे समजत नसेल तर जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे तो अर्ज द्यावा. त्यात पत्ता वगैरे द्या. पीएनजी कनेक्शनची व्यवस्था असल्याने तुम्ही अर्ज केलेला आहे आणि तरीदेखील तुम्हाला पीएनजी कनेक्शन न मिळाल्यास तुमचा एलपीजी पुरवठा बंद होणार नाही. तुम्ही पीएनजीसाठी अर्ज केलेला असल्याने तुम्हाला मिळणारा एलपीजी बंद होणार नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले. तसेच तुमच्या भागात पीएनजी कनेक्शनची सुविधा असूनही तुम्ही अर्जदेखील केला नसेल तर तुम्हाला मिळणारा एलपीजी बंद होऊ शकतो. असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
रेशन धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध
दरम्यान, राज्यात रेशन धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. केरोसीनही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीएनजी लाईनसाठी वेगळी परवानगी घेण्याची गरज नसून सरकारच ती सुविधा देणार आहे. तसेच, राज्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागू होणार नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट करत नागरिकांना दिलासा दिला आहे.
सरकारकडून आवश्यक उपाययोजना
याशिवाय, व्यावसायिक वापरासाठी गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. एलपीजी साठाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, ज्या नागरिकांनी पीएनजीसाठी अर्ज केला आहे पण अद्याप लाईन पोहोचलेली नाही, त्यांना एलपीजी सेवा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

