केंद्र सरकारचा नवा आदेश जारी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या घरात पाइपद्वारे पीएनजी या नैसर्गिक गॅसचा पुरवठा होतो, अशा ग्राहकांना घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन ठेवता येणार नाही. ‘ज्यांच्याकडे पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांनी एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच पीएनजी कनेक्शन असलेल्या व्यक्तींना एलपीजी सिलिंडर रिफिलदेखील आता मिळणार नाही. हा आदेश आजपासून लागू करण्यात आला.
दरम्यान जिथे अद्याप पीएनजी गॅस पोहोचलेला नाही, अशा लोकांना एलपीजी गॅसचा नियमित आणि सुरळीत पुरवठा व्हावा, हा या निर्णयामागे सरकारचा हेतू आहे. मात्र अनेक ग्राहक असे आहेत की, त्यांच्या नावे पीएनजी आणि एलपीजी असे दोन्ही कनेक्श आहेत. जर पीएनजी गॅस पुरवठ्यात काही समस्या निर्माण झाली तर अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या घरात एलपीजीचे सिलिंडरही आणून ठेवले आहे. मात्र आता सरकारच्या नव्या आदेशामुळे यातील कोणतेही एकच कनेक्शन वापरता येणार असल्याने अनेकांचे टेन्शन वाढले आहे.

