Homeलातूरपीक विमा कंपनीने २५ हजार शेतक-यांना वगळले

पीक विमा कंपनीने २५ हजार शेतक-यांना वगळले

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यात यावर्षी प्रचंड पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यासोबतच वित्तहानी व प्राणहानीही झाली आहे. यानंतर सरकारकडून पंचनामे करण्यात येऊन काही अंशी शेतक-यांना मदत झाली परंतु पिक विमा कंपनीने मात्र जळकोट तालुक्यातील शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. प्रचंड नुकसान झाले असतानाही विमा कंपनीने मात्र जळकोट तालुक्यास वगळले आहे. यामुळे विमा कंपनीसोबतच सरकारच्या विरोधातही तालुक्यातील शेतक-यांमध्ये प्रचंड रोष आहे .

जळकोट तालुक्यामध्ये २०२५ मध्ये प्रचंड पाऊस झाला मे महिन्याच्या ११ तारखेपासून पाऊस झाला. मे महिन्यामध्येच नदी नाल्यांना पूर आला होता. मे महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतक-यांची अंतर मशागतीची कामेही पूर्ण झाली नव्हती. यामुळे पेरणीही व्यवस्थित झाली नाही तसेच पेरलेले व्यवस्थित उगवलेही नाही. यानंतर थोड्या बहुत पावसावर पिके उगवली , शेतक-यांनी पिकामधील अंतरमशागत केली मात्र सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टी झाली नदी, नाल्यांना पूर आला, यामुळे पिकांचे अतोनात असे नुकसान झाले. यानंतर प्रशासनाने पिकांचे पंचनामे केले व नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाईही दिली. यानंतर ऑक्टोबर महिन्यात तर पावसाने कहरच केला. या पावसामुळे तब्बल वीस हजार शेतकरी बाधित झाले. यानंतर पंचनामेही करण्यात आले व पंचनामे करून शेतक-यांना मदत करण्यात आली .

शेतक-यांनी पेरणी केल्यानंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात विमाही भरला होता. यावर्षी मोठा पाऊस झाला आहे व नुकसान झाले होते त्यामुळे पीक विमा कंपनी शेतक-यांना पिक विमा मंजूर करेल अशी अपेक्षा होती मात्र विमा कंपनीने एवढा पाऊस पडून व प्रचंड नुकसान होऊनही जळकोट तालुक्यातील शेतक-यांना विमा मंजूर केला नाही. विमा कंपनीने लातूर जिल्हा वगळून टाकला आहे .यामध्ये जळकोट तालुक्यातील शेतक-यांचेही नुकसान झाले आहे. जळकोट तालुक्यास सतत तीन ते चार वर्षांपासून पिक विम्यापासून वंचित ठेवले जात आहे . याबाबतही शेतक-याकडून संताप व्यक्त केला जात आहे. सरकारकडून मदत मिळते सरकार दरबारी नुकसान झालेली नोंद आहे असे असताना पिक विमा कसा काय मिळत नाही असा सवालही शेतक-यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR