26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे पुस्तक महोत्सवात कोटींची उलाढाल

पुणे पुस्तक महोत्सवात कोटींची उलाढाल

पुणे : पुस्तक महोत्सवात साडेबारा लाख नागरिकांनी भेट देत सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केली असून, त्यातून सुमारे ५० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुस्तकांची विक्री आणि पुस्तक खरेदी करणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

या महोत्सवात ६० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांचा सहभाग होता. त्यामुळे युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी ठरला असून, आता हा महाराष्ट्राचा महोत्सव झाला आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितली.

पुस्तक महोत्सवात एकूण साडेबारा लाख नागरिकांनी भेट दिली आहे. यामध्ये तरुण-तरुणींची आणि शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होते. त्यामुळे वाचन चळवळ सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे पुस्तक महोत्सवाचा प्रवास सुरू आहे.

मोबाईल आणि गॅझेट्सच्या दुनियेतून बाहेर पडून नागरिक आणि तरुण पुस्तकांमध्ये रमल्याचे सकारात्मक चित्र येथे पाहायला मिळाले. लेखकांशी संवाद साधण्यासाठी आणि स्वाक्षरी घेण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा ही पुण्याच्या जागृत वाचन संस्कृतीची पावती आहे. गेल्यावर्षी साधारण २५ लाख पुस्तकांची खरेदी नागरिकांनी केली होती. यातून सुमारे ४४ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती.

यंदा दोन्ही प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केल्याने सुमारे ५० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. पुस्तक खरेदी करणा-यांमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. पुणे पुस्तक महोत्सवात यंदा एकूण तीन विश्वविक्रम करण्यात आले. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आल्याची माहिती पांडे यांनी सांगितली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR