पुणे : प्रतिनिधी
पुणे-सोलापूर महामार्गावर यवतजवळ अतिशय भयंकर अपघात झाला आहे. यवतमध्ये एका कारने दुभाजक ओलांडून दुस-या बाजूच्या दोन आलिशान गाड्यांना जोरात धडक दिली. या विचित्र अन् भयंकर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यवत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली अन् वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले. या अपघातातील मृतांमध्ये उरळी कांचन व यवत येथील दोघांचा समावेश आहे.
तर जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
उरळी कांचनमधील अशोक विश्वनाथराव थोरबोले आणि यवतमधील गणेश धनंजय दोरगे यांचा या अपघातात जागेवरच मृत्यू झाला. याबाबत ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश मारुती भोसले (रा. बोरीभडक, ता. दौंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

