पुणे : प्रतिनिधी
राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सोलापूर, अकोल्यातील अकोट, खोपोली येथे झालेल्या हत्यांमुळे निवडणुकीच्या काळातील गुन्हेगारी घटनांबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात काल रात्री मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या व्हीडीओत वडगाव शेरीतील सोपाननगरमध्ये दोन गटांत राडा दिसून येतो. याचवेळी कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावणा-या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सोपाननगर परिसरात काल रात्री उशिरा तरुणांच्या दोन गटांमध्ये दगडफेक व मारामारीची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून भयमुक्त व दहशतमुक्त वडगाव शेरीची मागणी जोर धरू लागली आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून या घटनेप्रकरणी पोलिस काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
काल रात्री ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे राबोडी परिसरामध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले असता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि राबोडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर घोषणाबाजी करत आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी नजीब मुल्ला यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

