पुणे : प्रतिनिधी
पुण्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मागच्याच आठवड्यात पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर आता पुण्यात सकाळच्या वेळेला बीएमडब्ल्यू कारमध्ये आलेल्या मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने रस्त्यावर अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना जागतिक महिला दिनाच्या दिवशीच घडल्याने ती अधिक गंभीर मानली जात आहे.
शनिवारी सकाळी एका मद्यधुंद तरुणाला शास्त्रीनगर चौकात रस्त्यावर लघुशंका करताना नागरिकांनी अडवलं. मात्र, त्याने गाडीमध्ये बसून अडवणा-या व्यक्तीला उद्देशून अश्लील हावभाव केले. त्यानंतर, गाडी भरधाव वेगात चालवत बेदरकारपणे पुढे गेला. दारू पिऊन गाडी चालवत असताना या तरुणाने आणि त्याच्या मित्राने महिलांसमोरही अश्लील वर्तन केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
चालक आणि त्याचा मित्र बीएमडब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणांकडून मोठा अपघात घडण्याची शक्यता होती, त्यामुळे शहरातील नागरिक अधिकच संतप्त झाले आहेत.