पुणे : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुण्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यातील सर्व २९ महापालिका निवडणुकांत महायुती म्हणून लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते.
मात्र, पुण्यात भाजप-शिवसेना यांच्यात युती होत असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची वारंवार चर्चा होत होती. अखेर त्यांच्यात सोमवारी (२२ डिसेंबर) मुंबईत चर्चा झाली आणि दोन्ही बाजूंनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी आज (२३ डिसेंबर) माध्यमांना दिली. त्याचवेळी शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. अजित पवार यांचा तीन दिवस पुण्यात मुक्काम आहे. चर्चेच्या फे-या सुरू आहेत. पुणे महापालिकेतील एकूण १६५ जागांपैकी कोण, किती जागांवर लढणार यावर आता चर्चा सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांच्या पक्षाकडून एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रशांत जगताप यांचा समावेश नाही.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत आणि दोन्ही पक्ष त्यांच्या चिन्हांवर निवडणूक लढवू शकतात, असे सुभाष जगताप यांनी स्पष्ट केले आहे. काही प्रभागांबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा त्यांनी केली. यावरून दोन्ही राष्ट्रवादी यांच्यातील चर्चा अंतिम फेरीत आल्याचे संकेत आहेत. कारण ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर २५ किंवा २६ डिसेंबर रोजी अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली.

