Homeमहाराष्ट्रपुण्यात भाजप कार्यकर्त्यांची हत्या

पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची हत्या

पुणे : पुण्यातील देहू रोड परिसरात मंगळवारी एका भाजप कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्याने देहू रोड परिसरात तणाव निर्माण झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.
गांधीनगरमधील रहिवासी रमेश रेड्डी यांची अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे, रमेश रेड्डी यांचा लहान भाऊ वर्षभरापूर्वी अशाच पद्धतीने मारला गेला होता.
मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजता रेड्डी हे पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालय परिसरात एका टेलरच्या दुकानात मित्रांसोबत गेले होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी रेड्डी यांच्यावर अचानक बेछूट गोळीबार केला.

हल्लेखोरांनी रमेश रेड्डी यांच्या हात, पाठ आणि डोक्यात तब्बल ९ गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. मित्रांनी त्यांना तातडीने एका रुग्णालयात दाखल केले, मात्र अतिरक्तस्त्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेतील सर्वांत भीषण बाब म्हणजे, वर्षभरापूर्वी रमेश रेड्डी यांचा सख्खा भाऊ जॉन रेड्डी याचाही अशाच प्रकारे गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आता पुन्हा त्याच कुटुंबावर हल्ला होत मोठ्या भावाचाही जीव घेतल्याने ही केवळ हत्या नसून ‘टार्गेट किलिंग’ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शहरात तणाव, महामार्ग रोखला
घटनेनंतर देहूरोडमध्ये संतापाची लाट उसळली. नातेवाईक आणि स्थानिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. काही काळ मुंबई-पुणे महामार्गही रोखण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR