सखल भागात पाणी, पिंपरीत वाहून गेली वाहने
पुणे : प्रतिनिधी
पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला पावसाने सलग दुस-या दिवशी झोडपले. पुण्यात मुसळधार पाऊस झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. दिवेघाटात ढगफुटी झाली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, पुण्यात सखल भागांत पाणी साठले आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शासकीय इमारतींना बसला. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे पुणे शहरातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. गेस्ट हाऊसमध्ये आमदार, माजी आमदार, सरकारी अधिकारी वास्तव्य व्यवस्था प्रभावित झाली. आज झालेल्या पावसामुळे या गेस्ट हाऊसमध्ये असलेल्या जिन्यापर्यंत पाणी साठले होते. येथील कर्मचा-यांनी पाणी जाण्यासाठी जागा केली. एवढेच नव्हे तर स्वत: कर्मचारी बादली आणून पाणी काढण्याचे प्रयत्न करत होते. पुणे शहरात जवळपास एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
पुण्यातील डोंगर माथ्यावरही मुसळधार पाऊस झाला. पुण्यातील दिवे घाट परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे रस्त्याला ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले. या पाण्यामुळे दगड आणि मातीही रस्त्यावर वाहून आली. पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार पाऊस कोसळला असून, पाण्याच्या प्रवाहात अनेक वाहने वाहून गेली.