पुणे : प्रतिनिधी
नयनरम्य रांगोळी, रसिकांच्या चेह-यावर दिसणारी उत्कंठा, तिसरी घंटा होते, भरजरी वस्त्रातील कलाकार आणि रसिकांमधील मखमली पडदा दूर होतो, ५६ नाट्यपदे, टाळ्या, वन्स मोअरची दाद देत पाच तास रंगलेला चार अंकी संगीत सौभद्र या संगीत नाटकाच्या प्रयोगानिमित्ताने. मराठी रंगभूमी, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने २४ ऑगस्ट रोजी अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित ‘संगीत सौभद्र’ या नाटकाचा दीर्घ प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
‘प्रिये पहा’, ‘लग्नाला जातो मी’, ‘राधाधर मधुमिलिंद जय जय’, ‘नच सुंदरी करू कोपा’, ‘पावना वामना या मना’, ‘बलसागर तुम्ही वीरशिरोमणी’, ‘पांडु नृपती जनक जया’, ‘पार्था तुज देऊन वचन’, ‘बहुत दिन नच भेटलो’, अशा गाजलेल्या अनेक नाट्यपदांसह सहसा प्रयोगात घेतली न जाणारी ‘वसंती बघुनी मेनकेला’, ‘अति कोपयुक्त’, ‘तुज देऊनी वचने’, ‘माझ्यासाठी तिने’, ‘व्यर्थ मी जन्मले’, ‘पुष्पपराग सुगंधीत’ ही पदे देखील रसिकांना ऐकावयास मिळाली.
पुणे शहरासह महाराष्ट्रातील अनेक संगीत नाटकप्रेमी रसिकांनी या दीर्घ प्रयोगास आवर्जून उपस्थिती लावली.
अनेक ज्येष्ठांनी जयमालाबाई शिलेदार यांनी सादर केलेला संगीत सौभद्रचा रंगलेला प्रयोग पाहिला होता.
निनाद जाधव, चिन्मय जोगळेकर, भक्ती पागे, ज्ञानेश पेंढारकर, डॉ. धनश्री खरवंडीकर, ओंकार खाडिलकर, सुदीप सबनीस, वैभवी जोगळेकर, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, निरंजन कुलकर्णी, अनुपमा कुलकर्णी, अवंती बायस, सयाजी शेंडकर, चिन्मय पाटसकर, रमा जोगळेकर, राकेश घोलप, संतोष गायकवाड यांनी भूमिका साकारल्या. तर लीलाधर चक्रदेव (ऑर्गन), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन), अभिजित जायदे (तबला) यांची समर्पक साथसंगत लाभली. दीप्ती शिलेदार-भोगले यांचे दिग्दर्शन होते तर वर्षा जोगळेकर यांनी संयोजन केले.

