पुणे : प्रतिनिधी
‘साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी अर्थकारणाची दिशा ’ या विषयावरील एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद येत्या दि.२९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पद्मश्री डों विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासन आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघ यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
साखर उद्योगा समोरील विविध प्रश्न,अडचणी,यावर व्यापक चर्चा होणार असून त्यावरील संभाव्य उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत तसेच दिवसभराच्या चर्चेतून एक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.परिषदेचे उद्घाटन राज्याचे साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डों सुरेश गोसवी असणार आहेत. राज्य सहकारी बँक प्रशासक विद्याधर अनास्कर,विस्माचे अध्यक्ष बी बी ठोंबरे,आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक आणि माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दिवसभराच्या परिषदेत आरबीआयचे संचालक सतीश मराठे, विस्माचे सचिव पांडुरंग राऊत,राज्य निवडणूक प्राधिकरण आयुक्त आणि माजी सहकार आयुक्त अनिल कवडे,राज्य सहकारी साखर कारखाना संघ व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ,राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे,विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले आदि यावेळी सहभागी होणार आहेत.

