पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात दोन अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. भोर तालुक्यात शेतात काम करताना यंत्रात स्कार्फ अडकल्याने एका महिला शेतक-याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे शहरातील कात्रज भागात नियमांचे उल्लंघन करणा-या डम्परने एका दुचाकीस्वार महिलेचा जीव घेतला. या दोन्ही घटनांमुळे संबंधित परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील भोर तालुक्यातील कुरुंगवडी येथील शुभांगी निलेश राऊत (४१) या शनिवारी सकाळी आपल्या शेतात मसूर आणि वाटाणा मळणीचे काम करत होत्या. ट्रॅक्टरला जोडलेल्या मळणीयंत्राच्या (थ्रेशर) साहाय्याने धान्य भरडण्याचे काम जोरात सुरू होते. सकाळी ११ च्या सुमारास काम करत असताना शुभांगी काही कारणास्तव मशिनजवळ वाकल्या. त्याच क्षणी त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि त्यांचे केस सुरू असलेल्या मशिनमध्ये ओढले गेले.
या मशिनचा वेग इतका प्रचंड होता की क्षणात त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात येताच जवळच असलेले नातेवाईक जयेंद्र सुरेश राऊत, संतोष शिळीमकर आणि ट्रॅक्टरचालक जगन्नाथ कांटे यांनी धाव घेत मशिनमधून त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शनिवारी त्यांचा वाढदिवस होता, मात्र ऐन वाढदिवशीच त्यांना मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे राजगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दुचाकीवरून कामावर जात असताना अपघात
तर दुसरीकडे, पुणे-सातारा रस्त्यावरील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयासमोर शनिवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास भीषण अपघात झाला. परिमा हेमंत प्रधान (३८) या आपल्या दुचाकीवरून कामावर जात असताना एका भरधाव डम्परने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत परिमा यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

