27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात २१ पासून ‘ज्ञानसागर’ प्रदर्शन

पुण्यात २१ पासून ‘ज्ञानसागर’ प्रदर्शन

पुणे : प्रतिनिधी
संशोधनाच्या क्षेत्रात गेली १०८ वर्षे कार्यरत असणा-या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या संग्रहातील महत्त्वाची हस्तलिखिते, ग्रंथ आणि मौल्यवान वस्तूंचा तसेच संशोधनप्रकल्पांचा समावेश असलेले ‘ज्ञानसागर’ हे प्रदर्शन येत्या शनिवारपासून सुरू होत असून ते सलग तीन दिवस ( २१ ते २३ फेब्रुवारी) खुले राहणार असल्याची माहिती कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी सांगितली.

मानद सचिव सुधीर वैशंपायन तसेच संस्थेच्या नियामक परिषदेचे सदस्य व प्रदर्शनाचे समन्वयक संतोष रासकर आणि मनोज एरंडे हे उपस्थित होते. माहिती देताना ते म्हणाले की, महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. खेलरत्न पुरस्कार विजेत्या ऑलिम्पिकपटू नेमबाज अंजली भागवत या प्रमुख अतिथी व अध्यक्षस्थानी संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अभय फिरोदिया असतील. या प्रदर्शनासाठी प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

‘ज्ञानसागर’ प्रदर्शनाच्या निमित्ताने महाभारत-सांस्कृतिक सूची या संशोधन प्रकल्पातील ‘भीम’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता लेले यांच्या हस्ते होणार आहे. युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समाविष्ट हस्तलिखिते, सुलेखन असलेली हस्तलिखिते, भारतीय आणि परदेशी भाषांमधील दुर्मिळ पुस्तके यांचा समावेश या प्रदर्शनात असेल. संस्थेची ३०० हून अधिक प्रकाशने, तसेच महाभारत, भागवत, अथर्ववेद, कोरीव लेख, वैज्ञानिक हस्तलिखिते आणि खगोलशास्त्रीय उपकरणे यांचा समावेश प्रदर्शनात असेल. देशातील मोठ्या शब्दकोशांपैकी एक, प्राकृत-इंग्रजी शब्दकोश प्रकल्प आणि ऐतिहासिक जैन व्यक्तिमत्त्वांचा कोश जैन प्रोसोपोग्राफी हेही येथे पाहता येतील.

वेरूळच्या शिल्पांचे डिजिटल संवर्धन
इन्फोसिस विद्याप्रकल्पातील संशोधकांनाही भेटता येणार आहे. सांस्कृतिक ठेव्याच्या जतनाकरिता संस्था करीत असलेले प्रयत्न पाहण्याची संधीही उपलब्ध राहील. तसेच संस्थेचे डिजिटल उपक्रम, भारतविद्या प्लॅटफॉर्म यांचा अनुभव, तसेच प्राचीन वैज्ञानिक ग्रंथाप्रमाणे केलेले प्रयोग आणि वेरूळच्या शिल्पांचे डिजिटल संवर्धन ही या प्रदर्शनाची विशेष आकर्षणे असतील, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR