उदगीर : प्रतिनिधी
तालुक्यात मागील पंधरा दिवसापुर्वी झालेल्या अतिवृष्टीत नळगीर येथील शेतकरी ओमप्रकाश पंढरीनाथ पेद्यावाड यांच्या शेतातून नाल्याच्या पुराचे पाणी गेल्याने शेतातील पीकाचे व जमीनीचे मोठे नुकसान तर झालेच शिवाय शेतातील माती ही वाहून गेली आहे. यासंदर्भात शेतकरी ओमप्रकाश पेद्यावाड यांनी तहसिलदार उदगीर यांच्याकडे तशी तक्रार करून पाहणी व नुकसानीचा पंचनामा करण्याची विनंती केली होती. मात्र या तक्रारीकडे संबधित महसूल प्रशासनाने साफ दुर्लक्ष करीत पाहणी व पंचनामा करण्याचे टाळल्याने आपली व्यथा व्यथा मांडावी तरीकोणापुढे असा प्रश्न सदरील शेतक-यापुढे पडला आहे.
उदगीर तालुक्यातील नळगीर येथील शेतकरी ओमप्रकाश पंढरीनाथ पेद्यावाड यांची पाझर तलावा लगत सर्वे न. २३५/९ क्षेत्र ०.५३ आर व सर्वे न. १९२/१ मध्ये राम पेद्यवाड, लक्ष्मण पेद्यावाड व उषाबाई पेद्यावाड यांची जवळाव्इतकी जमीन असून सदरील जमीनीत पंधरा दिवसापुर्वी झालेल्या अतिवृष्टीत तलावात जाणा-या नाल्याचे पाणी घुसून सदरील जमीनीतील पीकाचे व जमीनीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय या जमीनीतील माती पुरात वाहून गेल्याने नाला ही पडला आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीत संबधितांकडे तोंडी तक्रार करून ही कसलीच दखल घेतली गेली नसल्याने सदरील शेतकरी ओमप्रकाश पंढरीनाथ पेद्यावाड यांनी १३ ऑक्टोंबर रोजी तहसिलदार उदगीर यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार करून झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा करावा तसे आदेश संबधितांना द्यावेत अशी विनंती वजा मागणी केली होती. पंरतु लेखी स्वरूपात तक्रार देऊन ही महसूल प्रशासनाने याला गांर्भियाने न घेता अद्याप ही सदरील शेतक-यांच्या जमीनीतील झालेल्या नुकसानी पाहणी व पंचनामा केला नाही. त्यामुळे आता आपली व्यथा मांडावी तरी कोणापुढे असा प्रश्न शेतकरी ओमप्रकाश पंढरीनाथ पेद्यावाड यांच्यापुढे पडला आहे.

