लातूर : प्रतिनिधी
येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम नंदकिशोर रुकमे यांनी दक्षिण आफ्रिकेत ८ जून २०२५ रोजी पार पडलेली ९८ वी ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ ९० किलोमीटर ९ तास ५६ मिनीट वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करून लातूर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे.
पीटरमॅरिट्झबर्ग ते डरबन या दरम्यानची ९० किलोमीटर अंतराची ही शर्यत म्हणजे जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची अल्ट्रामॅरेथॉन, जिथे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक खंबीरतेचीही कसोटी लागते. ही ऐतिहासिक कामगिरी अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनती, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि कठोर परिश्रमांचे फलित आहे. पुरुषोत्तम रुकमे यांनी यापूर्वी धाराशिव ते कन्याकुमारी (१४०० किमी) सायकल मोहिम, अल्ट्रामॅरेथॉन, मॅरेथॉन, तसेच ३०० किलोमीटर सायकलिंग बीआरएम अशा अनेक अति-दुर्गम स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठीची तयारी ही सहजासहजी शक्य नव्हती. मागील सहा महिने रुकमे यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि समर्पित दिनचर्या सांभाळली. दररोज सकाळी ५ वाजता उठणे, त्यानंतर २ ते ३ तास धावणे, स्ट्रेंथ वर्कआउटआणि क्रॉस ट्रेनिंग करणे. गर्मीमुळे रात्रीच्या वेळेस लांब धावांचे सराव करणे. दुखापतीपासून बचावासाठी लेग स्ट्रेंथ, कोर स्ट्रेंथ, आणि क्रॉस ट्रेनिंगवर विशेष लक्ष. योग्य विश्रांती, संतुलित आहार, आणि झोपेची योग्य व्यवस्था. या कठोर सरावामुळेच त्यांनी ही जागतिक स्तरावरील धावपटूंसोबतची स्पर्धा अत्यंत आत्मविश्वासाने पार पाडली.
या यशस्वी वाटचालीसाठी रुकमे यांनी त्यांना मिळालेल्या सहकार्याची मनापासून कृतज्ञतापूर्वक नोंद घेतली आहे. राज्य सूचना व विज्ञान अधिकारी, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी, लातूर यांचे प्रोत्साहन. धाराशिव फिटनेस ग्रुप, रन फॉर लाईफ,लातूर फ४ल्ल ऋङ्म१ छ्राी, छं३४१, आणि रन स्ट्राँग टुगेदर ग्रुप लातूर ज्यांच्या सान्निध्यात प्रेरणा व सातत्य मिळाले. मार्गदर्शक शाम शिंदे यांचे याचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुटुंबाचा खंबीर आधार आईं, पत्नी आणि मुलींचे सहकार्य, आहार व आरामाचे व्यवस्थापन, आणि मानसिक आधार हे या यशामागचे खरे शक्तिस्थान ठरले.