मुंबई : ठाण्यातील शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप ( बाळू ) पूर्णेकर यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला अखेर अटक करण्यात यश आले आहे. तसेच दुसरा साथीदार हेल्मेटधारी आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी पप्या शिंदे या आरोपीला सुरुवातीला अटक झाली होती. त्याच्या चौकशीतून त्याचे साथीदार संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव आणि नितेश पवार अशा आरोपींची ओळख पटली होती. दरम्यान, ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा, या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त शिष्टमंडळाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
यावेळी माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष मनोज प्रधान उपस्थित होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे.
ठाण्यात पीएसआय किसन भोईर मृत्युमुखी पडले, त्यावेळी पोलीस यंत्रणा सक्षम झाली नाही. दाढीवाले पालकमंत्री आले आहेत, त्यांना अजून वेळ मिळाला नाही. भाजपचे आमदार, खासदार बाजूच्या जिल्ह्यातील लोक आले, पण पालकमंत्री आले नाहीत हे दुर्दैवी आहे अशी टीका शिवसेना नेते राजन विचारे यांनी म्हटले आहे. आम्ही पोलिसांना सांगितले की दबावाने या केसचा तपास करु नका, मी पोलिसांना दोष देत नाही, सर्व अधिकारी चांगले आहेत, त्यांनी तपास व्यवस्थित केला पाहिजे बाळू उर्फ प्रदीप पुर्णेकर यांचे शव पोलीस ठाण्यात घेऊन जावे लागले हे दुर्दैवी आहे असेही राजन विचारे यावेळी म्हणाले.
















