मुंबई : प्रतिनिधी
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर मंगळवारी (२६ मे) देशभरात सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आल्याने नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आणि जागतिक बाजारातील घडामोडींमुळे इंधन कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या ११ दिवसांत चौथ्यांदा ही दरवाढ करण्यात आली असून यामुळे रिक्षा, टॅक्सीसह सीएनजी वाहन चालक आणि प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. मंगळवारच्या नव्या दरानुसार, मुंबईत ८१ रुपये प्रति किलो असा दर आहे. तर पुण्यात ९२.५० प्रति किलो असा आहे.
११ दिवसांत चौथी दरवाढ
> १५ मे : २ रुपयांनी वाढ
> १८ मे : १ रुपयाने वाढ
> २३ मे : १ रुपयाने वाढ
> २६ मे (आज) : २ रुपयांनी वाढ
सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार फटका
सीएनजीचे दर वाढल्यामुळे मुंबई आणि पुण्यातील ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांकडून भाडेवाढीची मागणी करण्यात येत आहे. आधीच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे संतापलेल्या नागरिकांचे सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची टीका
सीएनजी दरवाढीवर काँग्रेसने पुन्हा हल्लाबोल केला आहे. ‘महागाई मॅन मोदींचा चाबूक पुन्हा एकदा जनतेवर. सीएनजी २ रुपयांनी महाग झाला आहे. गेल्या ११ दिवसांत सीएनजीच्या दरात ६ रुपयांची वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी आपल्या श्रीमंत मित्रांसाठी जनतेला लुटत आहेत.’’ असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे. पहिली दरवाढ १५ मे रोजी सुमारे ३ रुपयांनी झाली. त्यानंतर १९ मे रोजी सुमारे ९० पैशांनी, पुन्हा २३ मे रोजी सुमारे ९० पैशांनी आणि आता, २५ मे रोजी पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, गेल्या १० दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ७ रुपये ३५ पैसे आणि डिझेल प्रति लिटर ७ रुपये ५३ पैशांनी महाग झाले आहे. या दरवाढीचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाई आणखी वाढण्याची शक्यता असल्याने आता सामान्यांची चिंता वाढली आहे.
मुंबईसह राज्यातील सध्याची परिस्थिती
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या या दरवाढीमुळे राज्यातील महागाईचा आलेख पुन्हा उंचावला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १११.२१ रुपयांवर पोहोचला आहे तर डिझेलचा दर ९७.८३ रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, पुण्यातही पेट्रोल-डिझेलचे भाव मुंबईप्रमाणेच झाले आहेत. तर, कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल ११२.०९ रुपये तर डिझेलचे भाव ९८.७६ रुपये इतके झाल्याने याचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे.
















