जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात गेल्या दोन महन्यिापासून पेट्रोल डिझेल तसेच सीएनजीची टंचाई असून आता तर शेतक-यांच्या ट्रॅक्टरला डिझेल मिळेनासे झाले आहे. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात डिझेल टंचाई निर्माण झाली आहे .
सध्या जळकोट तालुक्यात मशागतीची कामे सुरू आहेत. यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर करीत असतात परंतु ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे रखडली आहेत. अगदी काही दिवसांनंतर मृग नक्षत्राचे आगमन होते. एकदा का मृग नक्षत्राचे आगमन झाले की कधीही पेरणी लागू शकते. यामुळे शेतक-यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यासाठी लगबग सुरू केली आहे. सध्या शेतक-याजवळ बैल जोडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी हे ट्रॅक्टरद्वारेच पेरणीपूर्व मशागतीची कामे करीत आहेत मात्र ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यामुळे शेती कामासाठी ट्रॅक्टर उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे शेतक-यांची कामे रखडली आहे .
पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्यामुळे इतर वाहनांनाही मोठा फटका बसत आहे. डिझेलवर चालणा-या कार तसेच ट्रक यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. जळकोट तालुक्यात अनेक पेट्रोल पंपावरील डिझेलचा साठा संपला आहे. डिझेलचे टँकर आले तरी केवळ दोन तासांमध्ये टँकर संपून जात आहे. एवढी प्रचंड गर्दी डिझेल खरेदीसाठी होत आहे. जळकोट तालुक्यातील घोणशी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम पंपावर शेतक-यांच्या ट्रॅक्टरसहित डिझेलसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. शेतकरी हे कॅन घेऊन २४ तासापासून रांगेत आहेत. डिझेलच्या बाबतीत गंभीर परिस्थिती जळकोट तालुक्यात निर्माण झाली आहे .
















