लातूर : प्रतिनिधी
केंद्र, राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रातील सहकारी साखर कारखाने, वीज मंडळ, एसटी महामंडळ, सहकारी बँक क्षेत्राती तसेच खाजगी क्षेत्रातील जवळपास ८१ लाख पेन्शनधारक ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या बॅनरखाली राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात पेंशनधारकांच्या सर्व रास्त मागण्या मान्य करुन घेण्यासाठी दि. ९, १० व ११ मार्च रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर देशभरातील सर्व राज्यातील जिल्ह्यामधील पेंशनधारक मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलन करणार असल्याची माहिती ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती, लातूर जिल्हाध्यक्ष विलास पाटील यांनी दिली आहे. पेन्शनधारक ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या बॅनरखाली राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात ८ वर्षांपासून ४ सुत्री कार्यक्रम राबवण्यासाठी रस्त्यापासून संसदेपर्यंत संघर्ष करत आहेत. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, सर्व पक्षाचे संसद सदस्यांकडे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी पाठपूरावा करत आहेत. परंतू पेन्शनधारकांचा आवाज कोणी उचलत नाही. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात येत नाहीत याचा रोष पेन्शनधारकांमध्ये आहे.
देशभरातील सुमारे ८१ लाख पेन्शनधारकांना ३० ते ३५ वर्ष सेवाकाळात पेंशन अंशदान ईपीएफओ मध्ये जमा केली आहे. तरी त्यांना सुमारे १ हजार १७१ रु. पेंशन देण्यात येत आहे. मात्र कोणते ही अंशदान जमा न करणा-यांना सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून रेवडी वाटप करत आहे. सरकारच्या या अमानवी व्यवहार व पेन्शनधारकांच्या हिताची जपवणुक न करण्याच्या धोरणारमुळे पेंशनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला आहे. यामुळे संसदेच्या दुस-या भागातील बजट सत्रास सुरु होण्याच्या काळात म्हणजेच ९, १० व ११ मार्च रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर देशभरातील सर्व राज्यातील जिल्ह्यांमधील पेंशनधारक मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. पेन्शनधारकांच्या या निर्णायक आंदोलनात लातूर जिल्ह्यातील सर्व पेंशनधारकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विलास पाटील यांनी केले आहे.

