वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती, बनावट पैठणींना आळा घालणे शक्य, पंढरपुरात दिली माहिती
पंढरपूर /प्रतिनिधी
पैठणी साडीची अस्सलता ग्राहकांना सहज ओळखता यावी आणि बनावट पैठणीच्या विक्रीला आळा घालता यावा, यासाठी शासनाने पैठणीवर बारकोड छापण्याचा निर्णय घेतला. या बारकोडच्या माध्यमातून पैठणी खरी आहे की खोटी, याची माहिती ग्राहकांना मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध विषयांवर माहिती दिली. यावेळी पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. ख-या पैठणीची ओळख होण्यासाठी बारकोडच्या माध्यमातून कोणता धागा वापरला, कोणत्या गावात कोणत्या कारागिरांनी ही पैठणी तयार केली, याची संपूर्ण माहिती ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बनावट पैठणी ओळखता येणार असल्याचे सावकारे यांनी सांगितले.
पैठणी ही महाराष्ट्राची पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख असून, तिच्या नावावर बाजारात बनावट साड्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ नये, तसेच अस्सल पैठणी तयार करणा-या विणकर व उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासनाने बारकोडची संकल्पना पुढे आणली आहे. पैठणीवर छापण्यात येणा-या बारकोडमुळे संबंधित साडीची ओळख आणि अस्सलतेची पडताळणी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पैठणी खरेदी करताना अधिक विश्वासार्हता मिळेल, तसेच अस्सल पैठणीच्या बाजारपेठेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
पैठणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे पैठणीला मागणी खूप आहे, तो एक कलेचा भाग आहे, महाराष्ट्रातील पैठणी उद्योग हा अनेक विणकर, कारागीर आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. पारंपरिक हातमागावर तयार होणा-या अस्सल पैठणीला बाजारपेठेत योग्य स्थान मिळावे, यासाठी शासनाच्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. एक पैठणी तयार करायला २० ते ३० दिवस एवढा कालावधी लागतो. पैठणीचे उत्पादन वाढविण्यासाठी कामगारांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीही विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
प्रदर्शनातूनही पैठणीची विक्री
पैठणी विक्रीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रदर्शन भरवत असतो, त्यामधूनसुद्धा पैठणी खरेदीसाठी चांगली मागणी मिळत असल्याचे सावकारे यांनी सांगितले. या माध्यमातून पैठणीला मार्केट मिळण्यास सोपे झाले आहे. यातून या उद्योगाला चालना मिळण्यास मदत होत आहे, असे सावकारे म्हणाले.
ग्राहकांना मोठा दिलासा
मंत्री सावकारे यांच्या या घोषणेमुळे पैठणी खरेदी करणा-या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, अस्सल पैठणी आणि बनावट पैठणीतील फरक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे.















