उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई, अल्पवयीन मुलीचा गैरवापर, १५ जणांविरुद्ध गुन्हा
लातूर : प्रतिनिधी
पैशांचा पाऊस पाडता येतो, या अंधश्रद्धेतून लक्ष्मीपूजेच्या नावाखाली अमानुष व अघोरी विधी करण्याचा प्रयत्न उदगीर ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. यासंदर्भात पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
उदगीरपासून २० कि.मी. अंतरावर लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ दि. १६ ऑगस्ट रोजी पहाटे २ च्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपींनी संगनमत करून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेचा विधी करण्याचे ठरविले होते. या कथित विधीसाठी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले.
या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५७७/२०२६ अन्वये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ मधील कलम ३ (३) तसेच पोक्सो कायद्यातील कलम १२ सह कलम १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
अंधश्रद्धेच्या नावाखाली प्रतिबंधित व अमानुष विधी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर स्वरूपाचा प्रकार समोर आल्याने पोलिसांनी पोक्सो कायद्याची कठोर कलमे लागू केली. घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ दखल घेत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप गाडे करीत आहेत.
आरोपी महाराष्ट्रासह तेलंगणा,
आंध्र प्रदेश, कर्नाटकातील
आरोपींमध्ये कुंडलिक देवराव रूपनर (४६, रा. तितरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), सचिन साहेबराव भोंगळे (३५, रा धानोरा वैद्य, ता. मूर्तीजापूर, जि. अकोला), अनिकेत सुभाष राठोड (२७, रा. वडी, ता. जिंतूर, जि. परभणी), समीर टिनघरे (रा. पुणे), लक्ष्मण विठ्ठल करंजी (३३), सनेश सुकुमार पनिके, परमनिरास (४५), दुर्गाप्रसाद मल्लेश ईरकला (२०), श्रीनिवास विरख्या चिलमुला (४५), (सर्व रा. आरसीपुरम, जि. संगारेड्डी तेलंगणा), बालाजी रघुनाथराव बिरादार (२५, रा मुबारकपूर, ता. नारायण खेड, जि. संगारेड्डी, राज्य तेलंगणा), अनंतराव गंगाराम खुनिकार (४८, रा निय्यापूर, ता शेरलिंगमपल्ली, जि. रंगारेड्डी, तेलंगणा), चंद्रया सुंदरराव कारम (४१, व्यवसाय मजुरी, रा. भिमावरम, ता भिमावरम, जि. वेस्ट गोदावरी, आंध्र प्रदेश), राजेश मोगली ईपन्नापल्ली (४२, रा दिलसुखनगर हैदराबाद, सुनिल कल्याण डेंगले (५२, रा हडपसर पुणे), राजू सेवू पवार (४८, रा. बिजापूर, ता. जि. बिजापूर, कर्नाटक), बालाजी हे आरोपी आहेत.
















