पुणे : प्रतिनिधी
राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रियेचे गुरुवारी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज निश्चितीची प्रक्रिया ३० जूनपर्यंत पूर्ण करता येणार आहे. गुरुवार सायंकाळपर्यंत १ लाख ५० हजार ६८४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.
तंत्रशिक्षण संचालनालयाने २० मेपासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली. संचालनालयातर्फे जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासह कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चितीसाठी आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रारंभी १६ जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावयाची होती. यानंतर २६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता गुरुवार (२६ जून) रोजी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
सुधारित वेळापत्रकानुसार प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान/वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. अर्ज नोंदणीसह कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करण्याची प्रक्रियाही याच दरम्यान करता येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्क्रूटनी पद्धतीसह ‘ई-स्क्रूटनी’ची सुविधाही आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी २ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. यानंतर आक्षेप, तक्रारी नोंदविण्यासाठी ३ ते ५ जुलै अशी मुदत देण्यात आली. ७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दीड लाख विद्यार्थ्यांची नोंदणी –
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला. २० मेपासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. यात दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. २६ जूनपर्यंत राज्यभरात १ लाख ५० हजार ६८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी अर्जासह शुल्क भरलेल्या अर्जांची संख्या १ लाख ३० हजार ८८५ एवढी आहे. राज्यात अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठीच्या संस्थांची संख्या ४१० आहे. यामध्ये सुमारे एक लाख १० हजार प्रवेश क्षमता आहे.
असे आहे सुधारित वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज भरणे : २० मे ते ३० जून
कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती : २० मे ते ३० जून
तात्पुरती गुणवत्ता यादी : २ जुलै
गुणवत्ता यादीवरील आक्षेप : ३ ते ५ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी : ७ जुलै