लातूर : प्रतिनिधी
बदलत्या हवामानाचा शेतीवर होत असलेल्या प्रतिकूल परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी शेतक-यांनी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीस शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. त्याअनुषंगाने विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय लातूर व मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हवामान अनुकूल तंत्रज्ञान व खरीप हंगाम पूर्व नियोजन करिता विभागस्तरीय कार्यशाळेचे कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे दि. १७ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते.
सदरच्या कार्यशाळेमध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञानमध्ये कापूस व तूर पिकातील जास्त उत्पादन देणारी व हवामान बदलास अनुकूल नवीन वाणाची लागवड तंत्रज्ञाना विषयी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील अरुण गुट्टे यांनी दिली तसेच डॉ. अनंत लाड यांनी कीड व रोग नियंत्रणा विषयी मार्गदर्शन केले. डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञाना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच रुंद सरी वरंबा व टोकण पेरणी पद्धती, सीआरए लागवड पद्धत व फळबाग लागवडीमध्ये विड मॅटचा वापर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे केंद्रातील तज्ञा डॉ. शिंदे सचिन व डॉ. उलेमाले पी. एच. यांनी माहिती दिली. काय दिलीप जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी, लातूर व देशमुख एस. बी, प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद लातूर व केंद्रातील बेद्रे एस. बी., मताई पी. डी. व डॉ. साळुंके एस. बी. यांची उपस्थिती होती.
यावेळी केंद्राच्या प्रक्षेत्रावर उभारण्यात आलेल्या विविध स्टोल ला सर्व अधिकारी यांनी भेटी देवून मातीचा नमुना गोळा करणे,जैविक खते व एक डोळा पद्धतीने उसाचे बेणे तयार करण्या विषयी माहिती जाणून घेतली. सदरील कार्यशाळेस नांदेड, परभणी, लातूर व धाराशिव येथील कृषी अधिकारी उपस्थित होते.

