पुणे : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी एका भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतक-यांना सुनावले होते. ज्यानंतर आता पार्थ पवारांच्या कंपनीचा जमीन व्यवहाराचा घोटाळा समोर येताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पवारांना कर्जमाफीच्या मुद्यावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अेंीिं ऌङ्म’्िरल्लॅ२ छछढ नावाच्या कंपनीने, १८०४ कोटींची महार वतनाची जमीन ३०० कोटींना घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पुराव्यासहित ही माहिती पोस्ट केली आहे. पार्थ पवार यांच्याशी संबंधित या जमीन खरेदीची ही माहिती समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. पण याच मुद्यावरून आता दमानिया यांनी शेतक-यांना कर्जमाफीवरून सुनावणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांना खडेबोल सुनावले आहेत. तर पोराच्या डीलमधील (महार वतनाच्या जमिनीचा व्यवहार) स्टॅम्प ड्युटीचे काय? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वी एका भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतक-यांना सुनावले होते. ‘‘कर्जमाफीबाबत जूनला निर्णय घ्यायचे ठरले आहे. तो कसा होईल ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्हीसुद्धा शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यावर वेळच्या वेळी पैसे परत करण्याची सवय लावा ना. सारखंच फुकटात, सारखंच माफ.. कसे व्हायचे? असे चालत नाही.’’ असे पवारांनी म्हटले होते. ज्यामुळे आता त्यांच्या याच विधानाचा संदर्भ देत दमानिया यांनी निशाणा साधला आहे.
याबाबत त्यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. ‘‘शेतक-यांना ‘सारखं फुकट, सारखं माफ लागतं’ म्हणणारे अजित पवार पण पोराचे १८०४ कोटींचे डील. त्यावर १२६ कोटींची स्टँप ड्युटी होते, हे डील ३०० कोटींचे दाखवून, त्यावरचे २१ कोटी देखील माफ ! ही माफी फुकट नव्हती का?’’ असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शेतक-यांना कर्जमाफीच्या मुद्यावरून सुनावणा-या पवारांना दमानियांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

