लातूर : प्रतिनिधी
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी लातूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दंडात्मक कारवाईचा फंडा पुढे आणला. या माध्यमातून दररोज लाखावर दंड वसुल करण्यात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस गुंतले आहेत तर शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीत नागरिक अडकले आहेत. शहरातील डालडा फॅक्टरीसमोरील नांदेड रोडवर सोमवारी दुपारी २.१० मिनीटांपासून तब्बल ३० मिनीटांचा ब्लॉक पडला. प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीने वाहनधारकांचा घाम काढला.
शहरातील नियम बा वाहनांवर, बेशिस्त पार्क करणा-या चाकी, दुचाकी वाहनांवर तसेच टेप, स्पिकर, एलइडी लाईट, रिंग रोडवर तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कींग करणा-या वाहनांवर, मोठे आवाज करणारे बुलेट सायलेन्सर आदींवर वाहतूक नियंत्रण शाखा लातूर यांच्याकडून ई-चलान मशिनद्वारे दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वाहतूक शाखेकडून सिग्नल कॅप्म रोड, जिल्हा क्रीडा संकुलसमोरील औसा रोड, महात्मा बसवेश्वर चौक परिसरातील रस्त्यावर लागणारे हातगाडे, रोडवर लावण्यात येणा-या दुचाकी, चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
ज्या ऑटोरिक्षाचे अनपेड ई-चलान भरणे थकीत आहे अशांविरुद्ध न्यायालयात खडले दाखल करण्यात येत आहेत. मुख्य चौकांमध्ये ५० ते ७५ मीटर अंतराच्या आत थांबणारे ऑटोरिक्षा व कोठेही थांबुन बेशिस्तपणे प्रवासी चढ-उतार करणा-या वाहनावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांच्याकडून कडक कारवाई केली जात आहे.
वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी कारवाई करणे चांगलीच गोष्ट आहे. परंतु, हे करीत असताना वाहतूकीचा बोजवारा उडणार नाही, वाहतुकीची कोंडी होणार नाही, त्याचा नागरिकांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. सोमवारी दुपारी नांदेड रोडवर अर्ध्यातांसापेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली होती. तेथे वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस नसल्याने वाहतुक कोंडीचा वाहनधारकांना तसेच नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागला.

