रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारली सूत्रे
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी त्यांच्या आठवणी सांगत त्यांना निरोप दिला. रश्मी शुक्ला यांनी आपल्या पोलिस महासंचालक पदाचा पदभार आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्याकडे सोपवला. सन १९९० च्या आयपीएस तुकडीचे भा. पो. से. अधिकारी सदानंद दाते यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक, पदाचा पदभार स्वीकारला.
महाराष्ट्र पोलिस दल त्यांचे नेतृत्व आणि अनुभवाने अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी रश्मी शुक्ला यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, पोलिस अधिका-यांनी रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळातील कामाचीही माहिती दिली. सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलिस महासंचालक म्हणून दातेंचा दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला.कर्तव्यनिष्ठ आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून सदानंद दाते यांची पोलिस खात्यात ओळख आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) तसेच राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाची (एसआयटी) देखील धुरा दातेंनी सांभाळली.
सीबीआय आणि सीआरपीएफमध्ये देखील दातेंनी वेगवेगळ््या पदावर काम केले, मीरा भाईंदर, वसई, विरार पोलिस आयुक्तालयाचे पहिले पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात दातेंनी दहशतवाद्यांशी दोन हात केले होते. दहशतवादी अबू इस्माईल आणि अजमल कसाब यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दाते जखमी झाले होते.दहशतवाद्यांच्या त्या ग्रेनेडचे शार्पनेल अद्यापही त्यांच्या डोळ््यात आहेत. सहपोलिस आयुक्त म्हणून त्यांनी मुंबई गुन्हे शाखेची तसेच मुंबईसह पोलिस आयुक्त कायदा व सुव्यवस्था म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे.

