रेणापूर : प्रतिनिधी
पोहरेगाव परिसरातील नागरिकांचा अतिशय जिव्हाळ्याचा शेतकरी बाजार तब्बल २७ वर्षांनंतर गजबजला. या शेतकरी बाजाराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, रेणाचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, जिल्हा परिषद सदस्या आशाताई भिसे, मनीषा कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आला .
तालुक्यातील पोहरेगावची ओळख पंचक्रोशीत ऊस पट्ट्यातील नावाजलेले गाव म्हणून ओळख आहे. २७ वर्षापूर्वी या गावात आठवडे बाजार भरत होता परंतु कालांतराने त्यात खंड पडत गेला. बंद पडलेला बाजार परत सुरू करण्यासाठी रेणा कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा परिषद सदस्या मनिषा कदम, माजी सरपंच गंगासिंह कदम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटीच्या प्रयत्नातून सोमवारी (दि.६) शेतकरी बाजारला सुरुवात करण्यात आली.
या बाजारामुळे भाजीपाला, उत्पादक, शेतकरी, कापड विक्रेते, स्टेशनरी, किराणा व मसाला व्यापारी आदींना थेट विक्रीची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे शिवाय या बाजारमुळे लहान मोठ्या व्यावसायिकांना नव्या व्यवसायाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ग्राहक व विक्रेत्यांची सोय झाली आहे. बाजारासाठी आलेल्या व्यापारी वर्गांचा सेवा सहकारी सोसायटी आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना बाजारासाठी प्रोत्साहित करण्यात आले. येणा-या काही काळात या बाजारामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला नक्कीच बळकटी मिळणार असून सामाजिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे, असे रेणाचे माजी चेअरमन सर्जेराव मोरे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती रमेश सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव चेपट, माजी उपसरपंच गंगासिंह कदम, डॉ. उमाकांत देशमुख, तानाजी कांबळे, उपसरपंच शालिवाहन सरवदे, सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय सरवदे, नितीन राऊत, भरत मोरे, सदानंद शिंदे, जगन्नाथ सरवदे, बाळासाहेब यादव, भगीरथ घाटूळे, गजानन राठोड, श्रीपती राठोड, व्यंकट मोरे, चतुर्भुज यादव, बप्पा कांबळे, अशोक आंबिलगे, विनायक गायकवाड ग्रामविकास अधिकारी संजय जाधव, तलाठी भागवत पवार, आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती.

