मुंबई : प्रतिनिधी
अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर केरळमध्ये मान्सून दाखल झाला. केरळमध्ये मान्सून ३ दिवस उशिराने दाखल झाला. याबाबत बोलताना प्रवीण कुमार वैज्ञानिक हवामान विभाग यांनी म्हटले की, मान्सून केरळमध्ये आला आहे. दक्षिण महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसांत मान्सून दाखल होईल. विदर्भात १५ जूननंतरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढचे २ ते ३ दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून जोरदार वा-यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी सध्या असेच तापमान कायम असेल, ४० ते ४२ डिग्री पर्यंत उन्हाचा पारा असेल. विदर्भात पुढील काही दिवस वादळीवा-याचा मध्यमस्वरूपाचा पाऊस होईल.
विदर्भासह राज्यात १५ जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वारा असणार आहे. पण अवकाळी पाऊस असेल, हा मान्सून पूर्व पाऊस नसेल. विदर्भाला मान्सूनसाठी अजून प्रतीक्षा कायम असणार आहे, मात्र १० जूननंतर परिस्थितीच्या अनुषंगाने याचा अंदाज घेता येईल.
विदर्भातील काही जिल्ह्यांत येत्या २४ तासांत काही ठिकाणी वादळासह तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशपासून विदर्भ होत रायलसीमापर्यंत उंचावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि झंझावात तयार झाला आहे. याच्या प्रभावाने येत्या २४ तासांत विदर्भातील काही जिल्ह्यांत विजा आणि वादळासह तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या काळात तापमानात चढ-उतार होणार असून उकाड्याचा त्रास कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी विदर्भाच्या बहुतेक शहरांत तापमानवाढ नोंदविण्यात आली असून ब्रह्मपुरीत राज्यात सर्वाधिक ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया आणि वर्धा येथे १ ते २ अंशाची वाढ होऊन तापमान ४१ ते ४२ अंशावर गेले.
















