27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रप्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर

प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर

रेव्ह पार्टीत पतीला अटक; रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई तसेच याच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे येथील रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कायद्यावर व पोलिस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असते. योग्य वेळी सत्य बाहेर येईल,अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली आहे.

पुण्यातील खराडी परिसरातील नामांकित हॉटेल स्टेबर्ड अझुर सुट या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सातजणांना अटक करण्यात आली. खेवलकर यांचा व्यवसाय जमीन खरेदी-विक्रीचा असून ते प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांचा राजकीय कुटुंबाशी संबंध आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील स्टेबर्ड अझुर सुट हॉटेलमध्ये प्रांजल खेवलकर यांच्या नावावर दोन रूम बुक करण्यात आल्या होत्या. एका रूमचे २५ ते २८ जुलै तर दुस-या रूमचे २६ ते २७ जुलैपर्यंतचे बुकिंग करण्यात आले होते.

प्रत्येक रूमसाठी १० हजार ३५७ रुपये भाडे अदा करण्यात आले होते, अशा पावत्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक राज्याचे जलसंपदा तथा कुंममेळामंत्री गिरीश महाजन यांनी, रेव्ह पार्टीत खडसे यांच्या जावईचा केवळ समावेश नव्हता तर, ते आयोजकच असल्याचा आरोप करत खडसे यांना कोंडीत पकडले आहे. दरम्यान, आज रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी कायद्यावर व पोलिस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असते. योग्य वेळी सत्य बाहेर येईल,असे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR