ठाणे : प्रतिनिधी
ठाण्यातील मानपाडा परिसरात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येने राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी रात्री त्यांच्या कार्यालयात घुसलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करत तसेच कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी तपास केला असून, आतापर्यंत पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांचा हत्येपूर्वी आरोपी पप्या शिंदे याच्याशी संपर्क झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे या पाच जणांची चौकशी सध्या महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या चौकशीतून हत्येच्या कटाबाबत आणखी काही माहिती समोर येते का, याकडे पोलिसांचे लक्ष आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्यावर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मानपाडा येथील गणेशनगर भागात हल्ला झाला. ते त्यांच्या कार्यालयात असताना काही हल्लेखोर तेथे आले. त्यांनी पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्यानेही वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी एकूण नऊ पथके तयार करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेची तीन पथके या तपासात काम करत असून, इतर सहा पथकेही आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत. हल्लेखोर मुंबई आणि मुंबईबाहेरील भागात लपून बसल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.
पप्या शिंदेशी संपर्कामुळे संशय वाढला
या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन महिला आणि दोन पुरुषांचा आरोपी पप्या शिंदे याच्याशी हत्येपूर्वी संपर्क झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संपर्कामागचे कारण काय होते, याचा तपास केला जात आहे. हत्येपूर्वी नेमकी कोणाशी चर्चा झाली? आरोपींना कोणाकडून मदत मिळाली? हल्ल्याची माहिती आधीपासून कोणाला होती का? या दिशेनेही पोलिस चौकशी करत आहेत.
















