लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी नगर विकास विभागाकडूनही कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. लातूर शहराची प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय राहणार आहे. हीच प्रभाग रचना कायम राहिल्यास सदस्य संख्या ७० असणार आहे. प्रभाग रचना ‘जैसे थे’ असली तरी गुगल नकाशावरुन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या संबंधीचे चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार असून आरक्षण कसे सुटते
यावरुन इच्छूकांमध्धे मात्र धाकधुक आहे.
लातूर नगरपालिकेचे लातूर शहर महानगरपालिकेत रुपांतर दि. २५ ऑक्टोबर २०११ रोजी झाले. लातूर शहर महानगरपालिकेची पहिली सार्वेित्रक निवडणुक २०१२ मध्ये झाली. दुसरी सार्वत्रिक निवडणुक २०१७ मध्ये तर आता तिसरी सार्वत्रिक निवडणुक २०२५ मध्ये होत आहे. २०१७ मध्ये निवडुन आलेल्या सदस्यांचा कार्यकाल २०२२ मध्ये संपला. त्यानंतर निवडणुक होणे अपेक्षीत असताना तब्बल ३ वर्षे निवडणुक रखडली. सलग तीन वर्षे लातूर शहर महानगरपालिकेवर प्रशासक राज राहिले. आता महानगरपालिकेची निवडणुक होत आहे.
नगर विकास विभागाने महानगरपालिका प्रशासनाला प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुर्व-पश्चिम, पुन्हा पूर्वेकड, अशा झेड पद्धतीने प्रभाग रचना करण्यास सांगीतले आहे. मात्र यापूर्वी अशाच पद्धतीने प्रभाग रचना झाल्याने चार सदस्यांचा प्रभाग अशी ‘जैसे थे’ स्थिती राहणार आहे. केवळ गुगल नकाशा नव्याने तयार करावा लागणार आहे. महानगरपालिका आयुक्तांनी प्रभाग रचना करुन जिल्हाधिका-यांकडे सादर कावी लागणार आहे. त्यानंतर राज्य निवडणुक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिका-यांकडे मान्यतेसाठी ती सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता घेवून ती प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यावरील सूचना, हरकती व सूचनांवर सुनावणी घेवून सुनावणीच्या अहवालासह अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणुक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करावी. सूनावणीनंतर प्राप्त अहवालानूसार अंतिम प्रभाग रचनेस मान्यता द्यावी, असे आदेश आहेत.