मुंबई : प्रतिनिधी
कौटुंबिक जबाबदा-या, आर्थिक ओढाताण आणि करिअरच्या अनिश्चिततेमुळे महानगरातील युवक मानसिकदृष्ट्या खचत आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालानुसार, देशातील प्रमुख शहरांमधील आत्महत्येची आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. देशातील प्रमुख ५३ शहरांतील आत्महत्यांच्या यादीत मुंबई तिस-या स्थानी आहे.
एनसीआरबीच्या २०२४ च्या आकडेवारीनुसार, दिल्ली (२,९०५) आणि बंगळुरू (२,४०३) नंतर मुंबईत सर्वाधिक १ हजार ४०६ आत्महत्यांची नोंद झाली आहे. मुंबईचा आत्महत्येचा दर प्रति लाख लोकसंख्येमागे ११ असला तरी महानगरातील बदलती जीवनशैली व सामाजिक अपेक्षांचे ओझे जीवघेणे ठरत असल्याचे दिसत आहे.
आत्महत्या करणा-यांमध्ये विवाहित पुरुषांचे प्रमाण ७१ टक्क्यांहून अधिक आहे. १ हजार ६१६ विवाहित मृतांमध्ये १ हजार १६२ पुरुष आणि ४५४ महिलांचा समावेश आहे. कुटुंब चालवण्याचा ताण, नोकरीतील अस्थिरता व सामाजिक प्रतिमेच्या ओझ्याखाली पुरुषांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार आत्महत्याग्रस्तांमध्ये ७४५ बेरोजगार आणि ३४३ रोजंदारी मजुरांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना महागाई आणि कर्जाचा ताण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. एकूण आत्महत्येच्या प्रकरणांपैकी तब्बल १ हजार २५८ जणांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी होते. याउलट उच्च उत्पन्न गटात आत्महत्येचे प्रमाण नगण्य आहे.
मुंबईत ३७८ विद्यार्थ्यांनीही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. दहावी-बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या वर्गात आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. बारावीपर्यंतच्या ५३७, तर दहावीपर्यंतच्या ५२५ जणांनी मृत्यूला कवटाळले. पदवीधरांमध्ये हे प्रमाण ३१९ इतके आहे.
संवादाचा अभाव, एकाकी वृत्ती
मुंबईसारख्या महानगरात वाढता वैयक्तिक तणाव, संवादाचा अभाव आणि एकाकी वृत्ती हे घटक आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे वळण्याची मानसिकता वाढत असल्याचे दिसते.
















