28.1 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रप्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर?

प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर?

पुण्यात राजकीय घडामोडींना वेग

पुणे : शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशा-याने पक्षाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. अखेर सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेनंतर प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रशांत जगताप आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचे जवळपास निश्चित केले आहे. बैठका, जागावाटप देखील सुरू आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार यावरून शरद पवार गटात नाराजी उफाळून आली होती.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत असल्याने नाराज असलेले प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर जगताप हे काँग्रेसमधील नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. पुण्यातील स्थानिक पदाधिका-यांशी चर्चा करूनच काँग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे जगतापांच्या पुढच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल असे जगताप म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR