नंदुरबार : प्रतिनिधी
अक्कलकुवा दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य समस्या पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या वेहगी, बारीपाडा गावातील एका गर्भवती महिलेला रस्ता नसल्याने तब्बल सात किलोमीटर बांबूच्या झोळीतून रुग्णालयात पोहोचवावे लागले. अर्थात सातपुड्यातील हा जीवघेणा प्रवास थांबता थांबत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
आदिवासी पाड्यांतील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी, बारीपाडा गावातील येथील अनिता वसावे (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे. बाळंतपणाची वेळ जवळ आल्याने अनिता वसावे यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज होती. परंतु, गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. शिवाय, त्या भागात मोबाईल रेंज नसल्याने रुग्णवाहिकेला फोनही लागला नाही. सर्व परिस्थितीत गावक-यांनी अनिता यांना बांबूची झोळी तयार करून त्यात बसवले. यानंतर खांद्यावर घेऊन ७ किलोमीटरचा जीवघेणा प्रवास सुरू केला. सुदैवाने, डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्याने अनिता आणि तिच्या नवजात बालकाची प्रकृती स्थिर आहे.
















