लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन दरमहा एक तारखेलाच थेट बँक खात्यात जमा करण्याचा अत्यंत ऐतिहासिक व संवेदनशील निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उच्च शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या या आदेशामुळे आणि ‘ई-कुबेर’ प्रणालीच्या प्रभावी वापरामुळे वेतनामध्ये मोठी नियमितता व पारदर्शकता आली असून, संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात अत्यंत समाधानी वातावरण निर्माण झाले आहे. दरमहा १ तारखेलाच नियमित वेतन मिळाल्याने प्राध्यापक व कर्मचा-यांचे आर्थिक नियोजन सुधारेल आणि त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामातील उत्साह अधिक वाढेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.
वेतन प्रक्रियेतील या गतिमान, सुटसुटीत आणि पारदर्शक नियोजनाबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले, प्रशासन अधिकारी संभाजी सूर्यवंशी, थेरोकर, लेखाधिकारी गोरे, अंबुरे व संपूर्ण वेतन विभागातील सर्व सहका-यांचे विशेष कौतुक केले जात आहे. शिक्षण विभागाच्या या प्रभावी प्रशासकीय नियोजनामुळे कर्मचा-यांच्या हितरक्षणासाठी एक अत्यंत सकारात्मक व वाखाणण्याजोगे पाऊल उचलले गेले आहे.
शासनाच्या या कौतुकास्पद निर्णयाबद्दल दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या वतीने प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहे. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष मकरंद सावे, सचिव रमेश बियाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी एका अधिकृत कृतज्ञता पत्राद्वारे राज्य सरकार व उच्च शिक्षण विभागाचे मनापासून कौतुक केले आहे. कर्मचारी हितासाठी दाखवलेली ही प्रशासकीय तत्परता अत्यंत कौतुकास्पद असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रातील कार्यउत्साह अधिक वाढेल, असे प्रतिपादन त्यांनी एका पत्राद्वारे केले आहे.
















