लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने लातूर शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या संदर्भात नागरिकांच्या काही अपेक्षा व सूचना असतील तर त्या कळविण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मनपाच्या सर्वसाधारण सभेने २०२३ मध्ये प्रारूप विकास योजना तयार करण्यास मान्यता दिलेली आहे. ही योजना तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या आराखड्याबाबत शहर व परिसरातील स्थानिक नागरिक, व्यावसायिक, मालमत्ताधारक, विकसक व काही विभागांना सूचना करावयाच्या असतील तर त्यांच्यासाठी ही संधी आहे. शहराची खरीखुरी गरज काय आहे?
हे या माध्यमातून कळू शकते. अशी माहिती संकलित करणे, सार्वजनिक कारणांसाठी लागणारी नवीन आरक्षणे, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्मशानभूमी, दुकाने, नवीन रस्ते व भविष्यातील अपेक्षित सोयी- सुविधा या संदर्भातील प्रश्नावली दि. ८ जून रोजी कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी या संदर्भातील आपले मत व सूचना लेखी प्रश्नावली मध्ये भरून नगर रचना विभाग येथे दि. ९ व १० जूनपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावयाच्या आहेत. या सूचनामुळे प्रारूप विकास आराखडा सर्वसमावेशक व लोकाभिमुख पद्धतीने तयार करता येणार आहे. नागरिकांनी आपल्या सूचना कळवाव्यात, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
















