लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी असतानाही लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्याचा सर्रास वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपले आरोग्य, आपलीच जबाबदारी अभियानाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांची भेट घेऊन प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबवून प्लास्टिक कॅरीबॅगची निर्मिती, विक्री, साठा, वितरण व वापर करणा-यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकमुक्त अभियान प्रभावीपणे राबविणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याची विनंती करण्यात आली.
याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती व संबंधित विभागांच्या संयुक्त विद्यमाने नियमित तपासणी मोहीम राबवून प्लास्टिक वापरावर प्रभावी नियंत्रण आणावे, अशीही मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
















