24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रफक्त टोलवसुली,सरकारचा कोडगेपणा अनाकलनीय

फक्त टोलवसुली,सरकारचा कोडगेपणा अनाकलनीय

वाहतूक कोंडीवरून राज ठाकरेंची जोरदार टीका

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३२ तासांहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली. यामुळे प्रवाशांना देखील मोठा त्रास सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीमध्ये लहान मुले, महिला आणि अनेक लोक अन्न-पाण्याशिवाय अडकून राहिले होते. एका गॅस वाहतूक करणा-या ट्रकचा अपघात झाल्यामुळे ही वाहतूक थांबली होती. अखेर हा ट्रक सरकवण्यात आल्यानंतर वाहतूक हळू हळू सुरू होत आहे. दरम्यान, या परिस्थितीवरून मनसे नेते राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. फक्त टोलवसुली केली जाते आणि नंतर चौकशी केली जाईल असे सांगितले जाते, अशी नाराजी राज ठाकरेंनी व्यक्त केली.

मनसे नेते राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून राज्य सरकारवर या वाहतूक कोंडीसाठी निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी लिहिले आहे की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकशा होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेते का? हा प्रश्न आहे.’’

मंगळवारी (३ फेब्रुवारी) संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे योग्य झाले. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृति आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्षे उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.

ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकशांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृति आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR