नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग-आधारित वार्षिक पासची घोषणा केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत फक्त ३ हजार भरून वर्षभर किंवा २०० ट्रिपपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. ही योजना १५ ऑगस्टपासून देशभर लागू होणार आहे.
केंद्र सरकार ३ हजार रुपयांचा फास्टॅग-आधारित वार्षिक पास सादर करत आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिली. येत्या १५ ऑगस्टपासून हा पास जारी केला जाणार असून, तो केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. गडकरी यांनी सांगितले की, हा पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० फे-या पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल) वैध राहील.
नवीन धोरण ६० किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोलनाक्यांसंदर्भातील जुन्या समस्यांचे निराकरण करते. एकाच, परवडणा-या व्यवहाराद्वारे टोल भरणे सुलभ करते. टोलनाक्यांवरील वेळ कमी करणे, वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहनांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणे, हा या वार्षिक पासचा उद्देश आहे, असेही गडकरींनी स्पष्ट केले.
ही योजना फक्त खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध असेल. पास एकदा सक्रिय केल्यावर तो एक वर्ष किंवा २०० प्रवासांपर्यंत, यापैकी जे आधी संपेल, तेवढ्यासाठीच वैध असेल. वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी एक स्वतंत्र लिंक लवकरच हायवे ट्रॅव्हल अॅप आणि NHAI/MoRTH वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. नागरिक ही लिंक सुरू झाल्यानंतर या अधिकृत अॅपद्वारे हा पास ऍक्टिवेट करू शकतील.
तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.