मुंबई : दिवाळीत यंदा फटाक्यांनाही महागाईची झळ बसली आहे. फटाक्यांच्या किमतीमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, किमती वाढल्यानंतरही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी आहे. फटाक्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फटाके विक्रेत्यांनी सांगितले.
आवाज करणा-या फटाक्यांसोबत आकाशात उंच जाऊन रोषणाई करणा-या फटाक्यांना जास्त मागणी आहे. मुंबईत तामिळनाडूमधून मोठ्या प्रमाणावर फटाके येतात. दक्षिण भारतामध्ये या वर्षी गेल्या दोन महिन्यांत पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे फटाक्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला. कच्चा माल तयार करणे तसेच फटाके बनविण्यात अडचणी आल्या. त्यामुळे दिवाळीपर्यंत अपेक्षित फटाक्यांची निर्मिती झाली नाही. परिणामी, दरवर्षीप्रमाणे फटाक्यांच्या पुरवठ्यात घट झाली आहे. साहजिकच फटाक्यांच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, त्याचा खरेदीवर परिणाम झालेला दिसत नाही. मशीद बंदर, कुर्ला, मालाड येथील फटाके विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी आहे. शनिवारी, रविवारीही फटाक्यांची चांगली विक्री होईल, असे व्यापा-यांनी सांगितले.
आपटी, रस्सी बॉम्ब हिट
आपटी बॉम्ब, फुलबाजे, पाऊस, चक्र या छोट्या मुलांच्या फटाक्यांना अधिक मागणी आहे. रस्सी बॉम्बसारख्या मोठ्या फटाक्यांच्या खरेदीकडेही लोकांचा कल आहे. रॉकेटसारख्या आकाशात उंच जाऊन फुटणा-या फटाक्यांची दरवर्षीप्रमाणे चांगली विक्री होत आहे. वेगवेगळ्या रंगांमध्ये फुटणारे आणि शॉट्स म्हणून ओळखले जाणारे फटाकेही पसंतीस उतरत आहेत. लहान मुलांच्या आवडीच्या पॉप-पॉप फटाक्याला चांगली मागणी आहे.
…या फटाक्यांचे आकर्षण
ब्ल्यू बेरी, किंग, फुटबॉल डबल धमाका, थ्री साऊंड रॉकेट, वंडरफुल हेवन ६० शॉट्स, अँग्री बर्डस्, ट्ंिवकल स्काय, इंडियन किंग, किटकॅट, कलर साऊंड असे अनेक फटाके बाजारात उपलब्ध आहेत.
फटाके महागले
फटाक्यांची वात तयार करणा-या नागपूर येथील कारखान्याला आग लागली होती. त्यामुळे फटाक्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. तामिळनाडूमधील शिवकाशी येथे अतिवृष्टी झाली. त्यामुळे फटाके निर्मितीमध्ये अडचणी आल्या. फटाके सुकविण्यासाठी ऊन गरजेचे असते. मात्र, तामिळनाडूत पाऊस असल्याने फटाके सुकविण्यात अडचणी आल्या.

