21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeलातूरफटाक्यांना फाटा द्या!

फटाक्यांना फाटा द्या!

दसरा आणि दिवाळी हे आनंदोत्सवाचे मोठे सण आहेत यात शंका नाही पण हा आनंदोत्सव साजरा करताना काही गोष्टींचे भान ठेवायलाच हवे. दिवाळीत तर आनंदाचा स्फोट होत असतो. हा स्फोट फटाक्यांचा असतो. सध्या देशासमोर हवा प्रदूषणाची फार मोठी समस्या बनली आहे. प्रदूषणाबाबत एकमेकांना दूषण देण्यापेक्षा आपण सारेच त्याला जबाबदार आहोत हे लक्षात घ्यायला हवे. प्रदूषण केवळ राज्यांपुरते मर्यादित नाही तर ती संपूर्ण देशाची समस्या आहे. दिवसागणिक वाढत्या वायुप्रदूषणामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मुंबईसह राज्यातील १७ शहरे प्रदूषित असल्याचा अहवाल जाहीर केला आहे. मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत गत काही दिवसांत वायुप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.

हवेची गुणवत्ता खालावत असल्याने श्वसनाच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. मुंबईसह राज्यातील हवेची ढासळलेली गुणवत्ता आणि दिवसेंदिवस वाढणा-या प्रदूषणाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने राज्य सरकार, सर्वच प्रशासन यंत्रणा, पालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाला धारेवर धरले. खालावत चाललेली हवेची गुणवत्ता ही कुणा एकाची जबाबदारी नाही, सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन याबाबत काम करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाने हवेची गुणवत्ता सुधारा अन्यथा बांधकाम प्रकल्प रोखू असा इशारा राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाला दिले आहेत. मुंबई शहर व उपनगरांत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे हवेत मोठ्या प्रमाणावर धुळीचे कण पसरत आहेत. ही गंभीर बाब आहे. हा सर्वसामान्य लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. आम्हाला विकासकामांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दिवाळीत फोडल्या जाणा-या फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार प्रदूषणकारी फटाक्यांवर देशभरात बंदी घालण्यात आली आहे. बेरियमयुक्त फटाक्यांवर बंदी आदेश फक्त वायुप्रदूषणाने त्रस्त दिल्ली व परिसरासाठी नसून संपूर्ण देशामध्ये लागू आहेत असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एका याचिकेद्वारे राजस्थान सरकारला फटाक्यांवर बंदी घालण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. दिवाळी व लग्नसराईमध्ये उदयपूर शहरात फटाके फोडण्यावर बंदी घालण्याबाबत राजस्थान सरकारला आदेश देण्याची मागणी हस्तक्षेप याचिकेत करण्यात आली होती. त्यावर न्या. ए. एस. बोपन्ना व न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने म्हटले की, या प्रकरणात वेगळे आदेश देण्याची गरज नाही. यापूर्वीच्या आदेशात वायुप्रदूषणाबरोबर ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी पाऊल उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच बेरियम आणि प्रतिबंधित रसायनापासून तयार करण्यात आलेल्या फटाक्यांवर अगोदरच बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फटाक्यांवरील बंदीचे आदेश फक्त दिल्ली आणि परिसरापुरते मर्यादित नाहीत तर ते सगळ्या राज्यांना बंधनकारक आहेत.

राजस्थान सरकारनेसुद्धा त्याचे पालन करावे. फटाक्यांमुळे ओढवणा-या हानीकारक दुष्परिणामांबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजकाल लहान मुले जास्त फटाके वाजवत नाहीत पण मोठे वाजवतात! प्रदूषण व पर्यावरण संरक्षण हे न्यायालयाचे काम नाही. त्यासाठी लोकांना पुढे आले पाहिजे. वायू व ध्वनिप्रदूषण कमी करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. बेरियम हा धातू रासायनिकदृष्ट्या अस्थिर असतो. त्यामुळे तो मूलद्रव्याच्या स्वरूपात सापडत नाही. मात्र त्याची संयुगे अतिशय विषारी असतात. बेरियमचे आयन अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास त्याचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे कंप सुटणे, अशक्तपणा, भयगंड, श्वसनात अडथळा, अर्धांगवात अशा गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका असतो. डोळे, पचनसंस्था, हृदयक्रिया, श्वसनसंस्था व त्वचेवरही बेरियमचे दुष्परिणाम होतात.

दिवाळीत उडवल्या जाणा-या फटाक्यांचे प्रदूषण प्राणी, पक्षी, वृद्ध नागरिक, गरोदर स्त्रिया, लहान मुले, रुग्ण यांना सर्वाधिक त्रासदायक ठरते. या फटाक्यांमुळे होणा-या ध्वनी व वायुप्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली असून दिवाळीत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेतच फटाके वाजवण्याची परवानगी दिली आहे. दिवाळी निरोगी वातावरणात साजरी करायची की फटाक्यांमुळे होणा-या प्रदूषणात याचा निर्णय नागरिकांनी घ्यायचा आहे असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. फटाके वाजवण्यावरील निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी पोलिस आणि महापालिका प्रशासनाची राहील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आम्ही फटाक्यांवर सरसकट बंदी घालत नाही, ती घातली तर अनेक मुद्दे उपस्थित होऊ शकतात. भारतात प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे. राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारात धर्माचे आचरण, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. फटाक्यांमुळे पर्यावरणावर परिणाम होतो की नाही किंवा किती प्रमाणात होतो हे आम्ही निश्चित करू शकत नाही. त्यामुळे फटाक्यांबाबतचा अंतिम निर्णय सरकारनेच घ्यायचा आहे असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

हवा प्रदूषण आरोग्यास धोकादायक ठरते. खराब हवेमुळे श्वसनाचे आजार जडतात. दमा, सर्दी, खोकला आदी रोग डोके वर काढतात. दिवाळीत वाजवल्या जाणा-या फटाक्यांमुळे, धुरामुळे वायुप्रदूषणात भरच पडणार आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषणाचा त्रास वाढणार आहे. हे सारे धोके रोखता येऊ शकतात. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, फटाक्यांचा नव्हे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली तर खूप काही साध्य होऊ शकते. फटाके फोडताना योग्य ती काळजी घेतली नाही तर अपघात होऊन कायमचे अपंगत्व येऊ शकते. फटाक्यांमुळे आग लागण्याचे प्रकार घडतात. फटाक्याच्या दुकानांना, कारखान्यांना आग लागून जीवित आणि वित्तहानी होण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. हे सारे निष्काळजीपणा, खबरदारी न घेतल्याने होते. तरी त्यापासून आपण काही शिकत नाही. हजारो वर्षांपासून दिवाळी साजरी केली जाते, त्या काळात फटाके थोडेच होते? दिव्यांचा सण म्हणूनच तो साजरा केला जायचा. फटाके फोडण्याचे फॅड अलिकडच्या काळातले आहे. त्यामुळे फटाक्यांना अवास्तव महत्त्व दिले जाऊ नये.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR