Homeमहाराष्ट्रफडणवीसांचे मुख्यमंत्रिपद घालवण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडून अघोरी पूजा

फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद घालवण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडून अघोरी पूजा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद घालवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी अशोक खरातकडून अघोरी पूजा करून घेतली असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. भोंदूबाबाच्या निमित्ताने ते आता मित्र पक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत पाच महिला आणि एका पुरुषाच्या तक्रारीवरून अशोक खरातवर बलात्कार केल्याचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, यामध्ये आणखी महिला समोर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खरातच्या मालमत्ता आणि संपत्तीचेही तपशील समोर येत आहेत.

भविष्य सांगण्याच्या नावाखाली आणि भय तसेच आमिष दाखवून महिलांवर अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोन हजार कोटींची त्याची मालमत्ता असल्याचे समोर आले असून त्याच्यावर देवेंद्र फडणवीस सरकारचीही मेहरनजर असल्याचे उघड झाले आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून अशोक खरात प्रकरणाचा प्रामाणिक तपास होण्याची अपेक्षा व्यक्त केली. या प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील असे ते म्हणाले.

अशोक खरात यांच्या सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने १ कोटी ५० हजार रुपयांचा निधी दिला असल्याची कागदपत्रे सपकाळ यांनी पोस्ट केली आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत, असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला.

अशोक खरात याचे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांसोबत फोटो समोर आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबतही फोटा समोर आले आहेत, असे सांगत सपकाळ म्हणाले की, मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती आहे, असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा महिन्यांपासून भोंदूबाबाच्या कारनाम्याची माहिती होती. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या काळ्या कारनाम्याची माहिती मिळूनही काही कारवाई केली नव्हती. पण जेव्हा फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद घालवण्यासाठी अघोरी पूजा सुरू झाली तेव्हा त्यांनी अशोक खरातविरोधात कारवाई सुरू केली, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR