पुणे : प्रतिनिधी
जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शेकडो वारक-यांबरोबर योग दिन साजरा केला आहे.
राज्य सरकारच्या पुढाकाराने ‘वारकरी भक्तीयोग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूरच्या यशवंत स्टेडियम धंतोली येथे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मंत्री नितीन गडकरी यांनी शेकडो नागरिकांबरोबर योगासनं केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला आणि योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गडकरी यांनी सांगितले की, ‘‘नियमितपणे योगासने करणे याचा आपल्या आयुष्यात खूप मोठा उपयोग होतो. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी योगशास्त्र आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. आज संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर योगाचा प्रसार झाला आहे आणि लोक योगासने करत आहेत. ही आपल्यासाठी खूप मोठी बाब आहे. मी सर्वांना आवाहन करेन की, आपल्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज नियमितपणे योग करावा, जेणेकरून आयुष्यात आरोग्याच्या दृष्टीने एक समाधान प्राप्त होईल.’