22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रफडणवीस सरकार पडणार

फडणवीस सरकार पडणार

आमदार राजू खरे यांचे खळबळजनक विधान

पुणे : प्रतिनिधी
राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी आपल्या धक्कादायक वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार पडेल, असे खळबळजनक विधान करताना राजकीय समीकरणंही सांगितली आहेत, त्यामुळे आमदार खरेंच्या विधानाची एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यात सध्या २९ महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आलेली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल अत्यंत धक्कादायक विधान केले आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र आले, तर फडणवीसांचे सरकार पडेल, असे विधान केल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
मागील नगर परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. त्या वेळी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली होती. आता महापालिकेतही अनेक ठिकाणी भाजपच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे.

पुण्याच्या प्रचारात तर अजितदादा आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल आहे, असे दिसून येत नाही, त्यातच आमदार राजू खरे यांनी फडणवीस यांचे सरकार पडेल, असे विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साठ, तर अजित पवारांकडे ४२ आमदार आहेत. इतर अपक्ष सोबत आले आणि हे सगळे सरकारमधून बाहेर पडले, तर फडणवीस हे मुख्यमंत्री राहतील का? सरकार पडले ना, असे म्हणत आमदार खरे यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.

मोहोळ मतदारसंघातून राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पण राष्ट्रवादीपेक्षा राजू खरे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळ आहेत. निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेतच होते. पण निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. निवडून आल्यानंतर महिनाभरातच आपण नावालाच तुतारीचे आमदार आहोत, असे विधान केले होते.
दरम्यान, आमदार राजू खरे यांनी फडणवीस सरकारबद्दल जाहीर कार्यक्रमात भाष्य केल्याने अनेक राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी आमदारांचे गणितही मांडल्याने राज्यात नवे समीकरण उदयाला येणार का, अशी चर्चा रंगली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR