मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्यामुळे आणि दमदार अभिनयकौशल्यामुळे सतत चाहत्यांमध्ये चर्चेत असते.‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे तिला अधिक लोकप्रियता मिळाली. प्राजक्ताला फरसाण खाण्यावरून अनेकदा ट्रोल केले जाते. त्यासंदर्भात तिचे बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने फरसाण खाण्यावरून होणा-या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल प्राजक्ता म्हणाली, उत्तम आहार आणि उत्तम दिनचर्या या दोन गोष्टीचे मी काटेकोर पालन करते. तुम्ही जे खाता, जसे खाता, तसे तुम्ही बनता, असे मला वाटते. त्यामुळे काय खायचे, याची निवड विचारपूर्वक करणे गरजेचे आहे.
जर तुमच्या आहारात भरपूर मैदा असेल, तर तुम्ही लठ्ठ होणार. मी फरसाण खाते. आज दुपारच्या जेवणात मटकीची भाजी होती. त्यामुळे नुसती भाजी आणि पोळी कसे खाणार म्हणून त्याच्यासोबत मी फरसाण घेतले होते. कधीकधी दोडक्याची भाजी असते, तर त्यावरही मी फरसाण टाकून खाते , मी फरसाण खाते, पण जेव्हा हास्यजत्रेमुळे मी फरसाण खात असल्याचे ग्लॉरिफाय केले गेले, तेवढे मी खात नाही. त्याचे प्रमाण खूप कमी असते. प्राजक्ताच्या फरसाण खाण्यावरून भन्नाट मीम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर तिच्या फोटोंच्या कमेंटमध्ये अनेकदा नेटकरी फरसाणचा उल्लेख करून तिची मस्करी करतात.

