निलंगा : प्रतिनिधी
एकीकडे भीषण दुष्काळाने शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले असताना, दुसरीकडे खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान, रोजगाराचा अभाव आणि हातात उत्पन्न नसल्याने ग्रामीण भागातील कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा परिस्थितीत घरोघरी जाऊन सक्तीने कर्जवसुली करण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत, अन्यथा काँग्रेसचे शेतकरी आणि शेतमजुरांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
यंदाच्या प्रतिकूल पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतून उत्पन्न मिळण्याची आशा मावळली असून, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांनाही पुरेसे काम मिळत नाही. परिणामी, दैनंदिन गरजा भागवतानाच अनेक कुटुंबांची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत खासगी फायनान्स कंपन्या आणि बचत गटांना कर्जपुरवठा करणा-या स्मॉल फायनान्स संस्थांकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. उत्पन्नाचे साधनच संकटात असताना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावणे कितपत योग्य? दुष्काळाच्या झळा सहन करणा-या कुटुंबांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या अडचणीत भर पडत असेल तर प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, अशी भूमिका साळुंके यांनी मांडली. प्रशासनानेही याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित कंपन्यांच्या वसुली पद्धतीची तपासणी करावी. दुष्काळामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या नागरिकांवर अन्याय होणार नाही, यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्जवसुली थांबविण्याबाबत शासनाने सूचना दिल्या असल्याचे नमूद करत, काही खासगी फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप साळुंके यांनी केला. संबंधित संस्थांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सक्तीची वसुली थांबवावी आणि संकटग्रस्त शेतकरी, शेतमजूर व महिलांना दिलासा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कर्जवसुलीच्या नावाखाली नागरिकांवर दबाव टाकण्याचे प्रकार सुरूच राहल्यिास काँग्रेस शेतकरी आणि शेतमजुरांच्या बाजूने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा स्पष्ट इशारा अभय साळुंके यांनी दिला आहे.
















